सरकारी कर्मचाऱ्याला 99.7 टक्के गुण, लिहिता-वाचता येत नाही; चौकशी सुरू
बेंगळूरु: प्रभू लक्ष्मीकांत लोकरे नावाच्या 23 वर्षीय कामगाराला दहावीच्या परीक्षेत 99.7 टक्के गुण मिळाले असून त्याला लिहिता वाचता येत नाही. फसव्या शैक्षणिक कागदपत्रांमुळे मुळे गुणवंत विद्यार्थ्यांना तोटा होत असल्याने न्यायाधीशांकडून गुन्हा दाखल.
22 एप्रिल 2024 रोजी पीओएन भरती परीक्षेच्या अंतिम मेरिट यादीत त्याचे नाव आल्यानंतर त्याच्या 10 वीच्या गुणांच्या आधारे लोकरे याला शिपाई पदासाठी निवडले गेले. लोकरे याला कर्नाटकच्या कोप्पळ जिल्ह्यातील स्थानिक न्यायालयात शिपाई कामगार म्हणून नोकरी मिळाली.
न्यायालयाच्या न्यायाधीशांच्या रडारखाली आलेल्या लोकरे यांना वाचन आणि लेखन यामध्ये अडचणी येत असल्याचे दिसून आले. न्यायाधीशांनी लोकरे यांच्या शैक्षणिक रेकॉर्डची चौकशी करण्यासाठी पोलिसांकडे तक्रार दाखल केली.
या प्रकरणी 26 एप्रिल रोजी प्राथमिक तक्रार दाखल करण्यात आली होती. एफआयआरमध्ये लोकारे यांनी सातवीच्या नंतर थेट दहावीच्या परीक्षा दिली आणि 625 पैकी 623 गुण मिळवले, असे म्हटले आहे. मात्र, त्याच्या या उत्कृष्ट शैक्षणिक कामगिरीनंतरही त्याला कन्नड, इंग्रजी किंवा हिंदीमध्ये लिहिता-वाचता येत नाही. त्यामुळे त्यांच्या पात्रतेबाबत गंभीर शंका उपस्थित होत आहेत.
इतर उमेदवारांनीही अशाच पद्धतीने सरकारी नोकऱ्या मिळवल्या आहेत का, याची चौकशी करण्याची न्यायाधीशांनी मागणी केली आहे. तसेच लोकारे यांचे हस्तलेखन आणि दहावीच्या परीक्षेच्या उत्तरपत्रिकेतील हस्तलेखन यांची तुलना करा, असेही तक्रारकर्त्याने पोलिसांना सांगितले आहे. न्यायाधीशांनी असे म्हटले आहे कि अश्या फसव्या शैक्षणिक कागदपत्रांमुळे मुळे गुणवंत विद्यार्थ्यांना तोटा होतो.
अनेकांनी सोशल मीडियावर त्यांच्या चिंता व्यक्त केल्या आणि शैक्षणिक मूल्यमापनात कोणत्याही प्रकारचा गैरवापर टाळण्यासाठी कठोर उपाययोजना करण्याचे आवाहन केले.
या प्रकरणी लोकारे यांनी आपल्या बचावासाठी दावा केला आहे की, दिल्ली शिक्षण मंडळाने आयोजित केलेल्या 2017-18 च्या दहावीच्या परीक्षेत ते खासगी उमेदवार म्हणून उपस्थित होते. कर्नाटकातील बागालकोट जिल्ह्यातील एका संस्थेत ही परीक्षा घेण्यात आली. पुढील चौकशी सुरु आहे.