खानापूर

हलगेकर साहेब…आम्हाला या खड्यांच्या हालातून मुक्त करा

खानापूर: 23 ऑगस्ट 2024 रोजी बैलूर गावातील 40 युवकांनी ग्रामपंचायत बैलूरकडे अर्ज सादर केला असून सर्व रस्ते त्वरित सुधारण्याची मागणी केली आहे.  याचबरोबर या भागाकडे आमदार साहेबांनी लवकरात लवकर लक्ष देण्याची विनंती केली आहे.  

या रस्त्याचे बांधकाम झाल्यास, गावातील लोकांसाठी आणि महाविद्यालयात जाणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी खूप सोयीचे होईल. बैलूर फाटा ते बैलूर गाव तीन कि.मी. तर बैलूर ते देवाचीहट्टी हा चार कि.मी. असा एकूण सात कि.मी. रस्ता आहे. या संपूर्ण रस्त्याची पावसामुळे वाताहत झाली आहे. बहुतेक ठिकाणचा रस्ता उद्ध्वस्त झाला आहे. जागोजागी मोठमोठे खड्डे पडले असून, त्यात पाणी साचले आहे. त्यामुळे संपूर्ण रस्ताभर लहान-मोठी तळी दिसत आहे. त्यातून चालणेही मुश्कील होऊन बसले आहे.

बैलूर गावापासून अर्ध्या शेडजवळ दोन्हीं बाजूला पडलेल्या खड्ड्यात बससह चारचाकी वाहने कलंडून कोणत्याही क्षणी अपघात होण्याची शक्यता आहे. इतर रस्त्यावर जीवघेणे खड्डे पडले आहेत. बैलूर-देवाचीहट्टी रस्त्याची अवस्था अशीच आहे. रस्त्याच्या दुर्दशेमुळे बस सेवेवर परिणाम झाला आहे. वाहनांचे पाटे तुटणे, पंक्चर होणे, इंजिन खराब होणे अशा समस्या निर्माण होत आहेत. त्यामुळे, बस वाहतूक बंद होण्याची भीती आहे. काही बस फेऱ्या अचानक रद्द केल्याने विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होत आहे.

त्यामुळे, आमदार श्री विठ्ठलराव हलगेकर साहेबांनी आता पुढाकार घेऊन रस्ता दुरुस्तीसाठी प्रयत्न करावे, अशी मागणी गावकऱ्यांनी केली आहे.

Related Articles

महाराष्ट्राच्या आराध्य दैवताचा पुतळा कसा कोसळला? कारण अनंत गांवकर अबनाळी यांचे यश, 2 लाखाचे बक्षीस खानापूर तालुक्यातील खराब रस्ते