खानापूरच्या एलआयसी एजंटला साडेचार लाखांचा गंडा
ऑनलाईन फसवणूक : धागेदोरे कोलकात्यापर्यंत, सीईएन पोलिसांकडून तपास सुरु
खानापूर: येथील एजंट शंकर नारायण माळवे (रा. गणेशनगर, खानापूर) यांच्या अकाऊंट मधून 4 लाख 45. हजार अकाऊंट हॅक करून काढले आहेत. मोबाईल बँकिंग अँपचा वापर करुन भामट्यांनी ही रक्कम लुबाडली आहे. या प्रकरणी त्यांनी बेळगावातील सीईएन पोलिस स्थानकात तक्रार नोंदविली आहे
बेळगांव समादेवी गल्लीत असलेल्या युनियन बँकेच्या शाखेत शंकर माळवे यांचे खाते आहे. गुरुवारी दिनांक 9 रोजी सकाळी सातच्या सुमारास या खात्यातून 4 लाख 45 हजार रुपये ऑनलाईन ट्रान्सफर करून काढण्यात आल्याचे माळवे यांच्या निदर्शनास आले. याबाबत त्यांनी तातडीने बँक मॅनेजर शी संपर्क साधून ही माहिती दिली.
कोलकत्ता येथील अकाऊंट मध्ये ते पैसे जमा
ही माहिती समजताच बँकेने तपास चालू केला असता माळवे यांच्या खात्यातून कोलकात्यातील कॅनरा बँकेच्या शाखेतील एका खात्यावर ही रक्कम ट्रान्सफर केल्याचे आढळून आले. सदर खाते बंद करण्यात आले आहे. मात्र, तत्पूर्वीच भामट्यांनी ट्रान्सफर केलेल्या रकमेपैकी बरीच रक्कम वेगवेगळ्या अकाऊंट वर ट्रान्सफर केली आहे. माळवे नेट बँकिंगचा वापर करत होते. त्यांचे नेट बँकिंगचे खाते हॅक करुन भामट्यांनी हा प्रकार केला असावा, असा अंदाज आहे. तसेच माळवे यांच्या बँक खात्याशी लिंक असलेल्या मोबाईलवरील ओटीपी आणि बँकेचे संदेश हॅक झाल्याचा संशय व्यक्त करण्यात येत आहे.
विशेष म्हणजे माळवे यांच्या मोबाईल क्रमांकावर भामट्यांनी अनेकवेळा ओटीपी नंबर पाठविले आहेत. सकाळी बँकेला याची माहिती द्यावी या विचाराने माळवे यांनी ते कुणालाही शेअर केले नाहीत. तत्पूर्वीच भामट्यांनी खात्यातील सर्व रक्कम आधी तिसऱ्या व्यक्तीच्या खात्यावर आरटीजीएस करून पाठवली होती. त्यामुळे, या खात्यात 74,800 रुपये शिल्लक आहेत. भामट्यांनी या खात्यावरुन दुसरीकडे पैसे ट्रान्सफर करुन काढले आहेत. त्यांच्या खात्याची माहिती पोलिस घेत आहेत.
त्यामुळे बँकेला दिलेली ग्राहकांची माहिती व मोबाईल क्रमांक सायवर गुन्हेगारांच्या हाती कसे लागतात, असा प्रश्न उपस्थित झाला आहे.
तुमची ऑनलाईन फसवणूक झाल्यास काय करावे?
ऑनलाईन फसवणूक आजकाल कोणासोबतही होऊ शकते, कारण अनेक बँक ट्रांजक्शन्स डिजिटल (Digital) पद्धतीने केले जात आहेत. डिजिटल ट्रांजक्शन्समुळे आपली माहिती आणि पैसे हॅकर्स हॅक करू शकतात. अश्या समस्येचे निराकरण करण्यासाठी 2021 साली भारत सरकारकडून एक हेल्पलाइन जारी केली आहे, जी ऑनलाइन फसवणुक संबंधित आपली तक्रार नोंदवण्यासाठी आहे.
कोणतीही ऑनलाइन फसवणूक झाल्यास तुम्हाला 155260 या नंबरवर त्वरित कॉल करावा लागेल. हे राष्ट्रीय हेल्पलाइन म्हणून सुरु केले आहे आणि हे रिपोर्टिंग प्लॅटफॉर्म आहे.