थंडी-तापाचे रुग्ण वाढले,तालुका रुग्णालयात डेंग्यूवरील उपचाराची सर्व सोय उपलब्ध
खानापूर : आठ दिवसांपासून सलग सुरु असलेल्या संततधारेने जनजीवन विस्कळीत झाले आहे. थंडी आणि गारठ्यामुळे रुग्णांचे प्रमाण वाढले असून आरोग्य विभागासह तालुका प्रशासन अलर्ट मोडवर आहे.
पश्चिम घाटात पावसाचा सर्वाधिक जोर असून भांडुरा नाला व म्हादई नदी दुथडी भरुन वाहत असल्याने कोंगळा, गवाळी, पास्टोली या गावांचा संपर्क तुटला आहे. मंतूर्गा पुल 3 दिवसांपासून पाण्याखाली आहे.
तालुका रुग्णालयात डेंग्यूवरील उपचाराची सर्व सोय उपलब्ध
सतत कोसळणाऱ्या पावसामुळे थंडी तापाचे रुग्ण वाढल आहेत.तालुका रुग्णालयात डेंग्यूवरील उपचाराची सर्व सोय उपलब्ध करण्यात आली आहे. आशा कार्यकर्त्या आणि अंगणवाडी सेविकांच्या मदतीने शहर तसेच ग्रामीण भागात रोज सर्वेक्षण केले जात आहे.
तालुका प्रशासन लागले कामाला
तहसीलदार प्रकाश गायकवाड यांनी अतिवृष्टीच्या पार्श्वभूमीवर शनिवारी जांबोटी, कणकुंबी भागाचा दौरा करुन महसूल विभागाच्या अधिकाऱ्यांकडून नुकसानीचा आढावा घेतला. लोकांचे आरोग्य आणि नुकसानग्रस्तांचे पुनर्वसन या कार्याला प्राधान्य देण्यात आले असून महसूल, आरोग्य, अग्निशमन व पोलिस दलाला 24 तास सतर्क राहण्याचे आदेश देण्यात आले आहेत.