मुसळधार पावसामुळे कर्नाटकातील जिल्ह्यात शाळा, महाविद्यालयांना सुट्टी
बेंगळुरू : कर्नाटकात आज उद्या जोरदार पाऊस पडेल, असा अंदाज कर्नाटक राज्य नैसर्गिक आपत्ती निरीक्षण केंद्राने (केएसएनडीएमसी) व्यक्त केला आहे. दरम्यान, भारतीय हवामान खात्याने जारी केलेल्या ‘रेड अलर्ट’नंतर उत्तर कन्नड जिल्ह्याच्या उपायुक्त लक्ष्मीप्रिया यांनी कारवार, अंकोला, कुमटा, होन्नावर, भटकळ, सिरसी, सिद्धापूर, येल्लापूर, दांडेली आणि जोयडा तालुक्यातील सर्व शाळा आणि पीयू कॉलेजांना सुट्टी जाहीर केली आहे.
रेड अलर्ट म्हणजे 24 तासांत 20 सेंटीमीटरपेक्षा जास्त मुसळधार ते अतिमुसळधार पाऊस. आयएमडीने दिलेल्या माहितीनुसार, उत्तर कन्नडमधील कॅसलरॉक मध्ये रविवारी सर्वाधिक 220 मिमी पावसाची नोंद झाली.
कारवार तालुक्यातील काही गावे पुराच्या पाण्याखाली गेली आहेत. पुरामुळे या गावांना पिण्याच्या पाण्याची टंचाई भेडसावत आहे. सिरसी, कुमटा आणि होन्नावर जिल्ह्यात खराब हवामानामुळे बऱ्याच घरांचे नुकसान झाले पावसाचा जोर आणखी वाढला तर पूरस्थिती आणखी बिकट होऊ शकते.