जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या निवडणुकीचं राजकारण तापलं – भाजप-काॅंग्रेस ‘गुप्त युती’ची चर्चा जोमात!
प्रतिनिधी | खानापूर
बेळगाव जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या निवडणुकीची घोषणा झाल्यानंतर राजकीय हालचालींना वेग आला असून, यंदा ही निवडणूक भाजप विरुद्ध भाजप आणि काँग्रेस विरुद्ध काँग्रेस अशी लढली जाणार, हे आता ‘ओपन सिक्रेट’ झालं आहे. ऑक्टोबर 19 रोजी होणाऱ्या निवडणुकीसाठी मोर्चेबांधणी सुरू झाली असून, खानापूर तालुक्यातील सत्ताधाऱ्यांनीही हालचाली सुरू केल्या आहेत.
आमदार हलगेकरांचा ‘सदिच्छा दौरा’ – निवडणुकीचा नारळ?
खानापूरचे आमदार विठ्ठल हलगेकर यांनी शुक्रवारी (१८ जुलै) पीकेपीएस सोसायट्यांच्या भेटीगाठींना सुरुवात करून निवडणुकीची दिशा स्पष्ट केली. त्यांनी खानापूर येथील पीकेपीएस सोसायटीला भेट देत विकासकामांवर चर्चा केली. पुढील काही दिवसांत ते तालुक्यातील सर्व ५८ पीकेपीएस सोसायट्यांना भेट देणार असल्याचं त्यांनी जाहीर केलं. या दौऱ्याला राजकीय दृष्टिकोनातून महत्त्व प्राप्त झालं असून, हे दौरे म्हणजे निवडणुकीच्या प्रचाराची अनौपचारिक सुरुवात मानली जात आहे.
राजकीय समीकरणं – ‘गुप्त युती’ की गरज?
मिळालेल्या विश्वसनीय सूत्रांच्या माहितीनुसार, आमदार हलगेकर (भाजप) आणि काँग्रेसचे विधानपरिषदेचे आमदार चन्नराज हट्टीहोळ्ळी यांच्यात ‘गुप्त संधान’ झाल्याची जोरदार चर्चा आहे. दोघांनी पक्षीय बेड्या तोडून एकत्र येण्याचा निर्णय घेतल्याचं समजतं. यामागे एकच उद्दिष्ट – भाजपचे माजी आमदार आणि विद्यमान संचालक अरविंद पाटील यांना शह देणे.
उमेदवारीसाठी ‘संघ समर्थन’ महत्त्वाचं
या निवडणुकीत उमेदवारी मिळवण्यासाठी ‘कृषी पत्तीन संघांचा’ पाठिंबा निर्णायक ठरणार आहे. हलगेकर आणि हट्टीहोळ्ळी – दोघेही यासाठी संघांच्या कारभाऱ्यांच्या भेटी घेत आहेत. ज्या उमेदवाराला अधिक संघांचा पाठिंबा मिळेल, त्याच्याच गळ्यात उमेदवारीची माळ पडणार, हे जवळपास निश्चित मानलं जात आहे.
काँग्रेस कार्यकर्त्यांमध्ये नाराजी – स्थानिक मतांची अस्वस्थता
काँग्रेसच्या स्थानिक कार्यकर्त्यांमध्ये हट्टीहोळ्ळी यांच्या भूमिकेबद्दल नाराजीचा सूर असून, खानापूरच्या राजकारणात बाहेरगावच्या नेत्यांचा हस्तक्षेप नको, अशी भावना जनतेत आहे. त्यामुळे ही ‘अबोला युती’ काँग्रेसला उलटंही पडू शकते.
भाजपमध्येही संभ्रम – अरविंद पाटील यांना बाजूला करण्याचा डाव?
भाजपच्या अंतर्गत राजकारणातही गोंधळ सुरू आहे. माजी आमदार अरविंद पाटील यांना डावलून आमदार हलगेकर स्वतः रिंगणात उतरण्याच्या हालचालींमुळे कार्यकर्त्यांमध्ये संभ्रम निर्माण झाला आहे. भाजपमधीलच दोन गट एकमेकांविरोधात उभे राहत असल्याचं चित्र आहे.
‘पैशांचा पाऊस’ आणि दबावाचे राजकारण
यंदा बँक निवडणुकीत ‘पैशांचा पाऊस’ पडणार असल्याचं बोललं जात आहे. अनेक कृषी पत्तीन संचालकांवर दबाव आणला जात असल्याचंही वृत्त आहे. “योग्य उमेदवाराच्या पाठिशी न राहिल्यास पुढच्या वेळी संघावर निवडून देणार नाही,” असा इशारा काहींना देण्यात आल्याची माहिती समोर येत आहे.
निष्कर्ष:
जिल्हा मध्यवर्ती बँकेची निवडणूक ही केवळ सहकारी संस्थेची निवडणूक राहिली नसून, ती सत्ताकेंद्रावर वर्चस्व प्रस्थापित करण्यासाठी लढवली जात आहे. भाजप-काँग्रेसमधील ही ‘अबोली युती’ आणि अंतर्गत कुरघोडी ही निवडणूक अधिकच रंगतदार बनवत आहे. मात्र, यामध्ये लोकशाही मूल्यं, सहकारी तत्वं आणि शेतकऱ्यांचा खरा हित – कुठे तरी हरवतोय, हे विसरून चालणार नाही.